जीवघेणा नायलॉन मांजा बंदी असताना सर्रास आढळून येतो. मांजाची छुप्या पद्धतीने विक्री होते. पर्यावरणास घातक असलेल्या नायलॉन मांजामुळे पशू पक्ष्यांची जीवितहानी होतेच, तसेच नागरिक गंभीर जखमी होतात. मात्र आता यामुळे मनुष्यहानीसुद्धा झाली आहे. हिरावाडीतील भारती जाधव या महिलेचा नायलॉन मांजाने गळा कापून मृत्यू झाला. शहर पोलिसांनी नायलॉन मांजा विक्री आणि वापर करणाऱ्याविरोधात कठोर भूमिका घेतली असून, शेकडो मांजाचे रीळ जप्त करण्यात आले आहेत. मात्र दरवर्षी जप्तीबाबत हेच चित्र असते. नायलॉन मांजाच्या विक्रीस बंदी असताना त्याची विक्री करणाऱ्या दुकानदारांना पकडले जाते. मात्र ही कारवाई आता एवढ्यावरच थांबवणार नाही. या दुकानदारांचे परवाने रद्द करावेत अथवा ते निलंबित करण्यात यावे, याबाबतचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे पाठवण्यात येणार आहे. तसेच यासाठी पाठपुरावासुद्धा केला जाईल. दुसरीकडे हा नायलॉन मांजा उत्पादित कोठे होतो, त्याचे वितरण कसे चालते याचाही तपास हाती घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
…तर दुकानाचा परवाना रद्द

