सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी ते २० दिवस काम करतील अशा प्रकारे कामाची आखणी करा’, असा आदेश वसई—विरार शहर महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. यांनी घनकचरा विभागाच्या ठेकेदारांना दिला आहे.
संपूर्ण शहर स्वच्छ आणि सुंदर राहावे यासाठी महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातर्फे दैनंदिन साफसफाई, छोटय़ा—मोठय़ा गटारातील गाळ काढून साफ करणे, औषध फवारणी, कचरा वर्गीकृत करून कचराभूमीवर पोहोचवणे इत्यादी कामे कंत्राटी कर्मचारी रोज करत असतात. सध्या वसई —विरार क्षेत्रात करोना रुग्णांच्या संख्येत मोठय़ा संख्येने वाढ होत आहे. मुंबई मनपा क्षेत्रात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे लक्षात आल्याने आयुक्त गंगाथरन डी. यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.
कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना करोनाची लागण होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित तपासणीबरोबरच त्यांना विश्रांती मिळणे गरजेचे आहे. शहर स्वच्छतेचे काम ३० दिवस सुरू राहील, पण कर्मचारी २० दिवस कामावर कार्यरत राहतील, अशा पद्धतीने प्रभागनिहाय वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांशी समन्वय साधून १०० टक्के साफसफाई, गटार साफसफाई, कचरा संकलन व इतर दैनंदिन कामकाजाचे नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आदेश आयुक्त गंगाथरन डी. यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या ठेकेदारांना दिले आहेत.
ज्येष्ठ कर्मचाऱ्यांना अनुपस्थितीची सवलत
ज्या स्थायी व अस्थायी कर्मचाऱ्यांचे वय ५५ वर्षे आहे आणि ज्यांना हृदयविकार, मधुमेह तथा ज्यांची रोग प्रतिकारकशक्ती कमी आहे अशा शासकीय कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात आली आहे. महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना त्यांचा संसर्ग होऊ नये, यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच ज्या कर्मचाऱ्यांचे वय ५५ वर्षांपेक्षा जास्त आहे असे अधिकारी, कर्मचारी या आपत्कालीन परिस्थितीत रजा घेऊ इच्छितात त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार रजा मंजूर करण्यात येणार आहे.
