प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीचा पती अभिनव कोहलीला घरगुती हिंसाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. मुलीला मारहाण केल्याप्रकरणी श्वेताने कांदिवलीच्या समता नगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अभिनव अनेकदा तिलाही मारहाण करत असल्याचा आरोप श्वेताने केला आहे.
दारुच्या नशेत अनेकदा मला आणि मुलीला मारहाण करायचा, असं सांगताना श्वेताच्या अश्रूंचा बांध फुटला. चार तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी अभिनवला अटक केली. मुलगी पलक हिला मोबाइलवर अश्लील फोटो दाखवून तिला शिवीगाळ करत असल्याचंही श्वेतानं सांगितलं.
अभिनव हा श्वेताचा दुसरा पती आहे. पलक ही श्वेता व तिचा पहिला पती राजा चौधरीची मुलगी आहे. राजावरही दारूच्या नशेत मारहाण केल्याचे आरोप होते. याच कारणामुळे तिने राजाला घटस्फोट दिला होता. त्यानंतर २०१३ मध्ये श्वेताने अभिनव कोहलीशी लग्न केलं. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर हे दोघं लग्नबंधनात अडकले होते. या दोघांना अडीच वर्षाचा एक मुलगासुद्धा आहे.
श्वेताने ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेतील प्रेरणा या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली होती. याशिवाय ‘बिग बॉस ४’ या रिअॅलिटी शोची ती विजेती असून काही चित्रपटांमध्येही तिने भूमिका साकारली आहे.
