आठ वर्षे IAS, IPS अधिकारी म्हणून मिरवणाऱ्या दोन भामट्यांना अटक

पोलिसांच्या माहितीनुसार, गौरव मिश्रा आणि अशुतोष राठी अशी या दोन आरोपींची नावे आहेत. नोयडा पोलिसांनी त्यांना सेक्टर १८ मधील मेट्रो स्टेशनवरुन ताब्यात घेतले. या दोघांविरोधात पोलिसांकडे खंडणी मागितल्याची तक्रार आली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांचा खाकी गणवेश, बनावट ओळखपत्र, आएएस आणि आयपीएस बॅजेस पोलिसांनी जप्त केले आहेत.

ज्या व्यक्तीने या दोघांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे त्या व्यक्तीचा आरोप आहे की, या दोघांनी राजकीय नेत्याचे नाव घेऊन माझ्याकडे खंडणीची मागणी केली होती. तसेच या दोघांनी पोलीस कर्मचाऱ्यांनाही बदल्या करण्याची धमकी देत पैसे उकळण्याचा उद्योग केल्याचे समोर आले आहे, नोयडाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक वैभव कृष्णा यांनी ही माहिती दिली.

दिल्ली परिसरातून यापूर्वी अशाच घटनांमध्ये दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दिल्ली पोलिसांची परिक्षा पास होत नसल्याने एका व्यक्तीने आपल्या कुटुंबियांना आणि होणाऱ्या बायकोवर छाप पाडायसाठी पोलीस अधिकारी झाल्याचे भासवले होते. आशिष चौधरी असे या तरुणाचे नाव असून त्याला दिल्ली पोलिसांनी जुलैमध्ये अटक केली होती. तसेच जून महिन्यांत नोयडा पोलिसांनी आदित्य दीक्षित आणि अखिलेश यादव या दोन जणांना ताब्यात घेतले होते त्यांपैकी आदित्य स्वतःला आयपीएस अधिकारी तर त्याचा सहकारी अखिलेश स्वतःला जनसंपर्क अधिकारी म्हणून भासवत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *