चौपाटीवर आले ब्ल्यू बॉटल्स जेली फिश;पर्यटकांमध्ये पसरली घबराट

नेहमी पावसाळया आधी ब्लू बॉटल्स नामक जेली फिश गुरूवारी सकाळी मोठ्या प्रमाणात संपूर्ण 4 किमी जुहू बीचवर आले आहे.त्यामुळे सकाळी जुहू बीचवर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या लोकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. यंदाच्या पावसाच्या मोसमात गिरगाव चौपाटीवर दि. 9 जून रोजी ब्ल्यू बॉटल्स जेली फिश आले होते.

गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावर भरपूर प्रमाणात आलेले जेली फिश बघून पर्यंटकांमध्ये चर्चेचा विषय बनला होता. गिरगाव चौपाटीवर जेली फिश आल्यामुळे पर्यटक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या वर्षीदेखील आकसा व जुहू चौपाटीवर मोठ्या संख्येने जेलिफिश आले होते. दरवर्षी पाऊस पडल्यावर जेलिफिश मुंबईतील चौपट्यांच्या किनारी येतात, मात्र यंदा पावसाळा उशीरा सुरु झाल्याने जेली फिशची दहशत मुंबईतील बीचेसवर आता वाढू लागली अशी माहिती सी गार्डीयन लाईफ गार्ड असोसिएशनचे संस्थापक सुनील कनोजिया यांनी  दिली.

दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जुहू,आकसा,गिरगाव,दादर या चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात जेली फिश येत असताना, मात्र पालिका प्रशासन जेली फिश पासून सावधान असे फलक लावत नाही. आज सकाळपासून जुहू बीचवर येणाऱ्या सेलिब्रिटी व पर्यटकांना सुमुद्रात जाऊ नका अशा सूचना आम्ही देत आहोत. अशी माहिती त्यांनी दिली. तसेच येथे जेली फिश चावल्यावर डॉक्टर्स, औषधे तात्काळ उपलब्ध होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

पावसाळ्या समुद्राला उधाण येत असल्याने अनेक पाण्यातले जीव समुद्रकिनारी येतात. आधी ब्ल्यू बटण नंतर ब्ल्यू बॉटल मग इतर जेली फिश येणे सुरू होते. यात सगळ्यात त्रासदायक ब्ल्यू बॉटल आहे ज्यात जास्त प्रमाणात विष आढळते. समुद्राचे तापमान वाढल्यामुळे यांचे पुनरुत्पादन वाढले आहे. दि,9 जून रोजी गिरगाव चौपाटीवर जेली फिश आले होते त्यांच्यामुळे कोणालाही दुखापत झाली नाही. अशी  माहिती दृष्टी लाईफ सेव्हिंग कंपनीचे व्यवस्थापक किरण शेलार यांनी दिली.

जेली फिश पावसाळ्यात प्रजोत्पादनाच्यावेळी समुद्रकिनारी येतात, यंदा ते उशीरा आले. हे जेली फिश निळ्यारंगाचे फुग्यासारखा त्यांचा आकार असून त्याच्या आत 7 ते 8 इंचाचा विषारी धागा असतो. जेली फिशचा स्पर्श झाल्यास अंगावर लाल चट्टे, खाज येणे, सूज येणे अशी लक्षणे दिसतात. कोणतेही जेली फिश शरीराला चिकटल्यानंतर घाबरून न जाता ते काढून खारट पाण्याने किंवा समुद्राच्या पाण्याने धुवून त्यावर बर्फाने शेक द्यावा. तसेच जीवरक्षकांकडे असलेले व्हाईट व्हिनेगर कापसावर घेऊन त्याचा वापर करावा अशी माहिती पालिकेचे लाइफगार्ड रजनीकांत  माशेलकर यांनी लोकमतशी बोलतांना दिली.

तीन वर्षांपूर्वी गणपती विसर्जनाच्या वेळी गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने जेली फिश आल्यामुळे गणेश भक्तांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मत्स्यविभागाने केलेल्या पाहणीमध्ये गिरगाव चौपाटीवर ‘स्टिंग रे’ ही आढळले होते. हे जेलीफिश गडद निळ्या रंगाचे  फुग्याच्या आकाराचे असून जेलीफिश चावल्यावर गरम पाण्याचा मारा करावा असे उपचार करावेत अशी माहिती किरण कोळी यांनी दिली.

जेली फिश दंश झाल्याची लक्षणे 

  • जर पायावर चावला तर शरीराच्या वरच्या भागात गाठ येते. जर वरच्या भागाला या जेलीफिशने डंख केला तर खालच्या भागाला गाठ येते आणि ती एक तास राहते
  • जेलीफिशच्या दंशामुळे त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे, त्वचेची लाही होणे असा त्रास होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *