‘लग्न न केल्यानेच 107 वर्ष जगले’, आजीबाईंनी सांगितलं दीर्घायुष्याचं रहस्य

‘लग्न करू नका आणि दीर्घायुषी व्हा…’असा दीर्घायुष्याचा नवा मंत्र लुईस सिग्नोर (Louise signore) नामक एका महिलेने दिलाय. तुम्ही विचार करत असाल ही कोण महिला आहे आणि तिने असं का म्हटलंय, तर… ही लुईस सिग्नोर नामक महिला कोणी सेलिब्रिटी वगैरे नक्कीच नाही. न्यू-यॉर्कच्या ब्राँक्स येथे वास्तव्यास असलेली ही एक सामान्य महिला. एक दिवसापूर्वीच म्हणजे बुधवारी(दि.30) या महिलेने आपला तब्बल 107 वा जन्मदिन साजरा केला. त्यानिमित्ताने  त्यांची मुलाखत घेतलीये.

“मी इतरांप्रमाणे व्यायाम करते, थोडाफार डान्स देखील करते आणि जेवण झाल्यावर ‘बिंगो’ नक्की खेळते. पण मी अजून लग्नच नाही केलंय, अद्यापही मी सिंगल आहे आणि खरंच मला असं वाटतं की लग्न न करणे हेच माझ्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य असावं. मी पण लग्न केलं नसतं तर किती बरं झालं असतं, अशी माझी बहिण सतत मला म्हणत असते”, असं लुईस सिग्नोर सीएनएनशी बोलताना म्हणाल्या. उल्लेखनीय म्हणजे त्यांच्या बहिणीनेही आजघडीला वयाची 102 वर्षे ओलांडलीत.

सध्या, एलेलिया मर्फी (Alelia Murphy, वय 114) यांना अमेरिकेतील सर्वात वृद्ध महिला म्हणून ओळखलं जातं. मर्फी या न्यू-यॉर्कच्या हार्लेम या भागात राहतात. विशेष म्हणजे सिग्नोर यांचा जन्मही हार्लेम येथेच झालाय.

सिग्नोर यांनी वयाची 107 वर्षे पूर्ण केल्यानिमित्त त्यांच्यासाठी हा आनंद साजरा करण्यासाठी कूप सिटी येथील बार्टो कम्युनिटी सेंटरमध्ये एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला 100 हून अधिकजण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *