सायकलवरून येत, महाविद्यालयाबाहेर विद्यार्थिनींना अश्लील स्पर्श करणाऱ्या विकृताला मालाड पोलिसांनी अटक केली. नबीहुसेन शेख (२४) असे अटक आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला १ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मालाड येथील एका नामांकित महाविद्यालयाबाहेर हा प्रकार घडला. २४ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तक्रारदार विद्यार्थिनी महाविद्यालयाच्या मागच्या गेटजवळ होती. त्याच दरम्यान तेथून सायकलवरून जात असलेल्या शेखने तिला अश्लील स्पर्श केला आणि पसार झाला. तरुणीने दुसºया दिवशी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, मालाड पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जॉर्ज फर्नांडीस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा त्यातील एका फूटेजमध्ये आरोपी अन्य एका महिलेला तशाच पद्धतीने अश्लील स्पर्श करताना दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी साध्या गणवेशात घटनास्थळावर पाळत ठेवली. त्याच दरम्यान शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास तो झोपडपट्टी परिसरातून सायकलवरून येताना दिसला. त्याच दरम्यान तपास पथकाने त्याला अटक केली. त्यानेही दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. तपासात दुसºया घटनेतील १९ वर्षीय विद्यार्थिनीचाही जबाब नोंदविला आहे. तसेच त्याने आणखी काही मुलींसोबत असा व्यवहार केला आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत.
