कारच्या चॉईस नंबरसाठी गुजरातच्या बिल्डरने मोजले तब्बल १९ लाख रुपये

कारसाठी आवडता चॉईस नंबर मिळवण्यासाठी गुजरातमधील एका बिल्डरने ऑनलाइन लिलावात चक्क १९ लाख रुपये मोजले आहेत. त्याच्या मर्सडीज बेंझ कारच्या एकूण किंमतीच्या ३३ टक्के इतकी ही रक्कम आहे. आवडीच्या चॉईस नंबरसाठी एखाद्या व्यक्तीने भरलेली इतकी रक्कम पाहून कोणाचेही डोळे विस्फारले असतील.

गोविंद परसाना असे या चॉईस नंबरसाठी १९ लाख रुपये भरलेल्या बिल्डरचे नाव आहे. तो राजकोट येथील रहिवासी आहे. या बिल्डरने आपल्या मर्सडीज कारसाठी ०००७ या चॉईस नंबरसाठी राजकोटच्या आरटीओकडे अर्ज केला होता. परसाना हे गणपतीचे भक्त आहेत. त्यामुळे ७ हा आकडा गुजराती भाषेतील अंकामध्ये लिहीला तर तो गणेशाच्या प्रतिमेसारखा दिसतो. त्यामुळे त्यांना हा क्रमांक हवा होता.

याबाबत बोलतना परसाना म्हणाले, मी चॉईस नंबरसाठी १९ लाख रुपये भरले मात्र, आरटीओने मला हा क्रमांक कारच्या नंबर प्लेटवर गुजराती भाषेत टाकण्यास परवानगी नाकारली. मी काही जेम्स बॉण्डचा फॅनही नाही जो ००७ या क्रमांकासाठी इतके पैसे भरेन. परसाना यांनी यापूर्वी त्यांच्या तीन गाड्यांसाठीही हाच क्रमांक घेतला आहे.

दरम्यान, गुजरातच्या आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले की, परसाना यांनी लिलावात हा क्रमांक १९.०१ लाख रुपयांचा विकत घेतला आहे. गुजरातमध्ये एखाद्या कारच्या क्रमांकासाठी आजवर मोजावी लागलेली ही सर्वाधिक रक्कम ठरली आहे. ज्यांचा अशा क्रमांकावर विश्वास आहे ते लोक अशा आवडत्या क्रमांकांसाठी मोठी किंमतही मोजायला तयार असतात.

आरटीओतील अधिकाऱी सांगतात की, १, ७, ११, ९, ९९ हे क्रमांक विकत घेण्यासाठी सर्वाधिक स्पर्धा असते. तर आपल्या चॉईस क्रमांकामध्ये लोक त्यांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, मुलांचा वाढदिवस अशा प्रकारच्या जीवनातील महत्वाच्या तारखांच्या क्रमांकाला पसंती देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *