चेक बाऊन्स झाल्याप्रकरणी अभिनेत्री कोयना मित्राला मुंबईतील सत्र न्यायालयाने सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान कोयना तिच्यावरील मित्राने सर्व आरोप फेटाळले असून मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अभिनेत्री पुनम सेठी हिच्याकडून तब्बल २२ लाख रुपयांची रक्कम २०१३ मध्ये कोयनाने उधार घेतली होती. ही रक्कम बराच काळ उलटून गेल्यावरही कोयनाने परत केली नाही. ती रक्कम परत करण्यासाठी कोयनाने तीन लाख रुपयांचा चेक पुनम सेठीला दिला होता. हा चेक बाऊन्स झाल्यानंतर पुनम सेठीने सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
याप्रकरणी कोयनाने मात्र पुनमचे सगळे आरोप फेटाळले आहेत. २२ लाख रुपये उधार देऊ शकण्याइतपत पुनमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही असा दावा कोयनाने केला आहे. तसंच आपण कधीच पुनमला उधार पैसे मागितलेच नव्हते असंही कोयनाने सांगितलं आहे.
दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यावर सत्र न्यायालयाने कोयनाला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेविरोधात कोयनाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.