कामोठ्यात कारच्या धडकेत २ ठार, पाच जखमी

कामोठे इथं भरधाव वेगातील कारनं सात ते आठ जणांना धडक दिल्याची घटना रविवारी रात्री घडली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून मृतांमध्ये ७ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. सार्थक चोपडे (वय ७) व वैभव गुरव (वय ३२) अशी मृतांची नावे आहेत. पाच जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

कामोठ्यातील सेक्टर सहामधील एका गजबजलेल्या रस्त्यावर हा भयंकर प्रकार घडला. भरधाव वेगात आलेल्या एका सेडान कार काही कळायच्या आत समोरून येणाऱ्या बाइक व स्कूल बसला धडक दिली. गाडीच्या धडकेत एक महिला व पुरुष रस्त्यावरच बेशुद्ध पडले. तर, एक दुचाकीस्वार रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. अन्य काही जणांनाही गाडीनं धडक दिली. त्यात ते जखमी झाले. जखमींना तात्काळ एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अपघातानंतर तिथं उपस्थित नागरिकांनी स्कोडाच्या चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे. कारमध्ये दारूचा बॉक्स सापडल्यानं हा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा प्रकार असावा, असा पोलिसांचा संशय आहे. अपघाताचं अंगावर काटा आणणारं सीसीटीव्ही फूटेज व्हायरल झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *