मेळघाटात सहा वर्षीय चिमुकलीवर अतिप्रसंग

एका सहा वर्षीय चिमुकलीवर ३० वर्षीय नराधमाने अतिप्रसंग केल्याची घृणास्पद घटना तालुक्यातील एका गावात गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने समाजमन सुन्न झाले. ग्रामस्थांनी त्या नराधमाची बेदम चोप देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. मन्साराम परसराम भिलावेकर (३०, रा. राणीगाव) असे आरोपीचे नाव आहे.
मेळघाटातील एक सहा वर्षीय चिमुकली गुरूवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घरासमोरील अंगणात मैत्रिणींसोबत खेळत होती. आरोपी मन्साराम भिलावेकर त्या चिमुकली जवळ गेला. तिला खाऊ देण्याचे प्रलोभन देत त्याच्या राहत्या घरी नेले. तेथे त्या चिमुरडीवर शारीरिक अत्याचार केला. तिचे आई-डील सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घरी पोहचल्यावर तिने आपबिती कथन केली.
पीडिताच्या पालकांनी गावातील पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधला व त्यांना घेऊन आरोपीला जाब विचारला. तेव्हा आरोपी मन्सारामने त्यांना शिवीगाळ करीत तेथून पळून गेला. मात्र, ग्रामस्थांनी त्याला पकडले. त्याला बांधून ठेवून बेदम चोप दिला. रात्री ९ वाजेपर्यंत त्याला बांधून ठेवले. पोलिसांशी संपर्क साधून घटनेचे गांभीर्य पटवून देण्यात आले. यावरून ठाणेदार विलास कुलकर्णी, उपनिरीक्षक रविकिरण खंडारे, प्रवीण बोंडे, साबुलाल दहीकर यांनी ५० किलोमीटर अंतरावरील राणीगाव गाठून आरोपी मन्साराम भिलावेकर याला अटक केली. पीडिताच्या आईच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भादंविचे कलम कलम ३७६, सहकलम पोक्सो ४ अन्वये गुन्हा नोंदविला. पोलीस कोठडी मिळविण्याकरिता आरोपीस अचलपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *