मरिन लाइन्स येथील बॉम्बे रुग्णालयाच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून गुरुवारी एका रुग्णाने आत्महत्या केली. सतीश खन्ना (६७) असे या रुग्णाचे नाव असून ते उच्च रक्तदाबाने त्रस्त होते.
चेंबूर येथील रहिवासी असलेल्या सतीश खन्ना यांना फॅमिली डॉक्टरच्या सल्ल्यानुसार १५ जुलै रोजी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना गुरुवारी रुग्णालयातून सोडण्यात येणार होते. याबाबतची कागदपत्रे घेण्यासाठी त्यांचा मुलगा कार्यालयात आणि पत्नी डॉक्टरांशी बोलण्यासाठी गेलेली असतानाच दुपारी साडेतीन वाजता त्यांनी अकराव्या मजल्यावरून उडी मारली. खन्ना यांचा जागीच मृत्यू झाला. आजाराला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
