झाड कोसळून वडील, मुलगा जखमी

पाऊस सुरू होताच शहरात झाडे उन्मळून पडण्याचे सत्र सुरू झाले असून बुधवारी दुपारी रिक्षावर झाड कोसळून वडील आणि मुलगा जखमी झाल्याची घटना घडली. यामध्ये मुलगा गंभीर जखमी असून दोघांवरही सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

योगेश राजेंद्र विश्वकर्मा (१८), राजेंद्र प्रसाद विश्वकर्मा (५१) अशी या जखमींची नावे असून उल्हासनगरमध्ये राहतात. पासपोर्टचे काम आटोपून बुधवारी दुपारी दोघेही रिक्षातून निघाले होते. योगेश हा रिक्षाचालकाच्या बाजूला बसला होता. रिक्षा एमटीएनएल ऑफिसच्या येथे आल्यानंतर अचानक रिक्षावर झाड कोसळले. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाची टीम आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ योगेश आणि राजेंद्र या दोघांना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. रिक्षात पुढे बसल्याने योगेश गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

नौपाड्यात गोखले रोडवर सकाळी ६ वाजता जॅग्वार आणि मर्सिडिज बेंज या कारवर झाड कोसळल्याची घटना घडली होती. मंगळवारी रात्री हिरानंदानी मेडोज येथील एका हॉटेलच्या नावाच्या पाटीला किरकोळ आग लागली होती. तसेच रात्री उपवनमधील रामबागमध्ये सुरेश गौड यांच्या मालकीच्या घरावरही झाड कोसळले होते. यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले असून घराला तडे गेले आहेत. यातही कोणी जखमी झाले नाही. घर तत्काळ रिकामे करून सील करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *