मुलीवर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या बापाची केली हत्या

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या बापाची २६ वर्षीय मुलीने कुऱ्हाडीने वार करुन हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यात आज ही घटना घडली आहे. विवाहित असणाऱ्या आरोपी मुलीला अटक करण्यात आली आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी एका कार्यक्रमानिमित्ताने घरी आली असताना हा धक्कादायक प्रकार घडला. घटनेच्या रात्री मुलगी कार्यक्रमाहून आल्यानंतर घरी झोपली होती. यानंतर काही वेळाने तिचे वडील खोलीत आले आणि जबरदस्ती करु लागले. मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता वडिलांनी जास्तच जबरदस्ती करण्यास सुरुवात केली अशी माहिती मिळाली आहे. घटना घडली तेव्हा घरात अतिप्रसंगास विरोध करत असताना मुलीने घराच्या कोपऱ्यात ठेवलेली कुऱ्हाड उचलली आणि अनेक प्रहार केले. या हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाला. काही वेळाने इतर नातेवाईक आले तेव्हा त्यांनी मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचं पाहिले. याबाबत चौकशी केली असता मुलीने घडल्या प्रकाराची माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी घटनेला दुजोरा दिला असून नेमकं कारण काय आहे याचा तपास पोलीस करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *