लाखो प्रवाशांची रोज ने-आण करणाऱ्या उपनगरी गाड्यांमध्ये पत्ते खेळण्यास रेल्वे प्रशासनाने अधिकृतरीत्या बंदी घालून दीर्घ काळ लोटलेला असला तरी आजही मध्य रेल्वेवर अनेक वेळा पत्तेबहाद्दर पत्ते कुटत असल्याचे दिसत आहे. पत्ते कुटणाऱ्यांचा हुकूम आजही हटलेला नसल्याने प्रवाशांत संताप व्यक्त होत आहे.
मोठ्या जिकिरीने व धक्के खात रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, भर गर्दीत जागा अडवून पत्ते खेळणाऱ्यांचा विलक्षण त्रास होत असे. त्याबाबतच्या तक्रारींची तीव्रता वाढल्यानंतर उपनगरी गाड्यांत पत्ते खेळण्यावर बंदी घालण्यात आली. मात्र तरीही ही बंदी धुडकावून मध्य, तसेच पश्चिम रेल्वेच्या गाड्यांमध्ये आजही बिनदिक्कत पत्ते खेळले जात असल्याचा अनुभव आहे. मध्य रेल्वेवर काही ठराविक गाड्यांमध्ये ठराविक स्थानकांत चढून पत्त्यांचा डाव रंगवणाऱ्यांची रोजची टोळकी आहेत. त्याबाबतची तक्रार ट्विटरच्या माध्यमातून रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडे नोंदवूनही फारसा उपयोग होत नाही, असा प्रवाशांचा अनुभव आहे.
हे पत्तेबहाद्दर केवळ पत्तेच खेळतात असे नाही, तर दरवाजानजीकची जागा अडवतात व त्यामुळे प्रवाशांना त्रास होतो. त्याखेरीज पत्ते कुटण्याच्या नादात, त्यातील हिशेब करण्याच्या नादात स्वतःच्या आवाजाचा ‘डेसिबल’ वाढल्याचे भान त्यांना राहात नसले तरी प्रवाशांना मात्र त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
….
घाटकोपर व मुलुंड आघाडीवर!
मध्य रेल्वेवर पत्ते खेळणारी टोळकी प्रामुख्याने घाटकोपर व मुलुंड या दोन स्थानकांत गाड्यांमध्ये चढतात, असे अनेक प्रवाशांचे सांगणे आहे. या टोळक्यांच्या गाड्या, डबे ठरलेले असतात. त्यामुळे रेल्वे पोलिस दल वा इतर संबंधितांना त्यांच्यावर कारवाई करणे फारसे कठीण नाही. मात्र तरीही त्यांच्यावर कारवाई का होत नाही, त्यामागे नेमकी काय कारणे आहेत, असे प्रश्न प्रवासी विचारत आहेत.
…..
लोकलमध्ये मनोरंजन म्हणून पत्ते खेळणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचे बंधन नाही. तथापि, पत्ते खेळताना पैशांची देवाण-घेवाण करणे, जूगार खेळताना लोकलमधील अन्य प्रवाशांना त्रास देणे अशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित प्रवाशांवर रेल्वे कायद्यांतर्गत कारवाई करणे शक्य असल्याची माहिती रेल्वेतील सुत्रांनी दिली.