अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकातल्या कलाकारांचा अलीकडेच घामटा निघाला. नाट्यगृहातली वातानुकूल यंत्रणा बंद असल्यामुळे, लाइट्सच्या प्रखर प्रकाशात घामाघूम होत कसाबसा प्रयोग सादर करण्याची कलाकारांवर आली. नाट्यगृहाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रेक्षकांवरही उकाड्यानं हैराण होत प्रयोग पाहावा लागला.
आधीच कडक उन्हाळा आणि त्यात नाट्यगृहाची वातानुकूल यंत्रणा बंद पडलेली. त्यातच पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात’अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाचा प्रयोग कसाबसा पार पडला. घामाघूम होत प्रयोग सादर करण्याची वेळ कलाकारांवर आली तर प्रेक्षकांनाही हा उकाडा सहन करत प्रयोग पाहिला. नाट्यगृहाच्या या ढिसाळ कारभाराबाबत संताप व्यक्त होत होता.
शनिवारी रात्री झालेल्या या नाटकाच्या प्रयोगाला प्रेक्षकांनी गर्दी केली होती. प्रेक्षागृहातील वातानुकूल यंत्रणा बंद होती. एसी आता सुरू होईल, थोड्या वेळानं सुरू होईल अशी आशा मनात बाळगून प्रेक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. वातानुकूल यंत्रणा बंद असल्याबद्दल कोणतीही सूचना नाट्यगृहाकडून देण्यात आली नव्हती. काही वेळानं प्रेक्षकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. तेव्हा काही वेळासाठी प्रयोग थांबवण्यात आला. तांत्रिक बिघाडामुळे वातानुकूल यंत्रणा बंद पडली असून लवकरच ती सुरू करण्यात येईल, असं ठेवणीतलं उत्तर नाट्यगृह व्यवस्थापनाकडून देण्यात आलं.
मध्यंतरानंतरही यंत्रणा सुरू न झाल्यानं प्रेक्षकांनी पुन्हा एकदा आवाज उठवला. त्यानंतर पंखे मागवण्यात आल्याचं व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं. नाटकातल्या कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधत, ‘बसणं असह्य होत असल्यास प्रेक्षक जाऊ शकतात, त्यांचे पैसे परत दिले जातील’, असं सांगण्यात आलं. मात्र, प्रेक्षकांनी परत न जाता प्रयोग पाहण्यास पसंती दिली. कलाकार अशा परिस्थितीत प्रयोग करू शकतात, तर आम्ही प्रेक्षक नक्कीच बसू शकतो, असं सांगत प्रेक्षकांनी नाटक पाहायचं ठरवलं. प्रयोग संपता-संपता पंख्यांची व्यवस्था करण्यात आली. वातानुकूल यंत्रणा जर आधीपासूनच बंद होती तर नाट्यगृह व्यवस्थापनानं पर्यायी सोय का केली नाही? नाटकाच्या व्यवस्थापकांना तसं सांगण्यात का आलं नाही? असा सवाल विचारला जात होता.
पनवलेच्या प्रयोगाला मी उपस्थित नव्हतो. पण घडलेला प्रकार माझ्या कानांवर आला आहे. याची तक्रार मी पालिकेकडे करणार आहे. तसंच नाट्यनिर्माता संघापुढेही हा प्रश्न मांडणार आहे. प्रेक्षकांनी जी सहनशीलता दाखवली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
सुनील बर्वे, निर्माता, अमर फोटो स्टुडिओ
वातानुकूल यंत्रणा बंद आहे हे जर माहीत होतं तर त्यांनी पर्यायी सोय करायला हवी होती. पंखे मागवण्यात आले, पण तेही प्रयोग संपता-संपता. या सगळ्यात प्रेक्षकांचं सहकार्य आणि पाठिंबा मिळाला ही मोठी गोष्ट आहे.
अमेय वाघ, अभिनेता
आम्ही आमच्या बाजूनं पूर्ण सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. झाल्या प्रकाराबद्दल प्रेक्षागृहात जाऊन प्रेक्षकांशी संवाद साधून दिलगिरी देखील व्यक्त केली आणि पुढे प्रयोग पार पडला.
अरूण कोळी, व्यवस्थापक, फडके नाट्यगृह, पनवेल