सासूच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने सूनेने राहत्या घराच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना राधानगरी रोडवरील आपटेनगर पाण्याची टाकी येथे घडली. सून शुभांगी संदीप लोखंडे (वय ३९) तर सासू मालती मधुकर लोखंडे (७०) अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
लोखंडे दाम्पत्य दोघेही सेवानिवृत्त झाले असून त्यांना संदीप लोखंडे हा एकलुता एक मुलगा आहे. तो एका खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतो. त्याची मृत पत्नी शुभांगी ही गृहिणी होती. या दोघांना शिवतेज (वय १६ ) एकलुता मुलगा असून तो दहावीला आहे. मालती यांना कॅन्सर असल्याने गेले काही महिने त्या अंथरुणाला खिळून होत्या. त्याची प्रकृती गेल्या चार दिवसापासून अधिकच बिघडली. शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. हा धक्का सून शुभांगी यांना सहन झाला नसल्याने त्या धावत तिसऱ्या मजल्यावर असलेल्या देवघराकडे गेल्या. तेथील अंगारा घेऊन सुनेने राहत्या घराच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली. हा प्रकार परिसरातील नागरिकांना समजताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. घटनास्थळी शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी भेट दिली. त्या म्हणाल्या, शुंभागी हिचा पाय घसरून मृत्यू झाला असावा, असा पतीचे म्हणणे आहे. मात्र आत्महत्या की घातपात असा संशय व्यक्त केला असून तपास सुरु केला आहे.
