‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रेयसीची हत्या करून प्रियकर फरार

प्रेयसीचा खून करून प्रियकर फरार झाल्याची घटना पुण्यातील नऱ्हे परिसरातून उघडकीस आली आहे. सोनाली भिंगारदिवे असं या मृत तरुणीचं नाव आहे. सोनाली अभियांत्रिकीच्या अखेरच्या वर्षाला शिकत होती. खून करणारा तिचा प्रियकर सोमेश घोडके हा फरार आहे.

नऱ्हे इथल्या झील महाविद्यालयात सोनाली शिक्षण पूर्ण करत होती. काही दिवसांपूर्वीच सोनालीने कॉलेजजवळ एक घर भाड्यानं घेतलं होतं. या घरात संशयित सोमेश घोडके आणि सोनाली एकत्र राहत होते.

काही निमित्तानं सोनाली-सोमेश या दोघांमध्ये मतभेद झाले. त्यामुळे चिडलेल्या सोमेशने सोनालीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात सोनालीचा जागीच मृत्यू झाला. मृतदेह कुजल्यानंतर परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे नागरिकांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे याची तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. खून साधारणत: तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सोनालीच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाजवळ सोमेशने लिहून ठेवलेली एक चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागलेली आहे. त्यामध्ये तो स्वतःही आत्महत्या करणार असल्याचं लिहिलेलं आहे. पोलीस सोमेशचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *