ग्राहकाच्या परवानगीशिवाय अथवा अवैधपणे त्याच्या खात्यातून पैसे काढल्यास झालेल्या नुकसानीला संबंधित बँक जबाबदार राहील. बँक या जबाबदारीपासून पळू शकत नाही, असं स्पष्ट मत केरळ हायकोर्टानं व्यक्त केलं आहे. ग्राहकानं एसएमएस अलर्टचं उत्तर दिलं नाही तरी, अवैधपणे त्याच्या खात्यातून पैसे काढले असल्यास बँक जबाबदार राहील, असं न्या. पी. बी. सुरेश कुमार यांनी नमूद केलं.
परवानगीशिवाय खात्यातून पैसे काढल्यानं संबंधित ग्राहकाचे २.४ लाख रुपयांचे नुकसान झाले होते. त्याची भरपाई देण्याचे आदेश कनिष्ठ न्यायालयाने स्टेट बँक ऑफ इंडियाला दिले होते. या आदेशाला बँकेनं हायकोर्टात आव्हान दिलं होतं. खात्यातून रक्कम काढल्याचा एसएमएस अलर्ट ग्राहकाला पाठवला होता. त्यावर ग्राहकाने खाते ब्लॉक करण्यासंबंधी कळवायला हवे होते. मात्र, एसएमएस मिळाल्यानंतरही ग्राहकानं त्याला उत्तर दिलं नाही. त्यामुळं त्याच्या झालेल्या नुकसानीला आम्ही जबाबदार नाही, असा युक्तीवाद बँकेनं केला होता. कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. ग्राहकाच्या खात्यातून परवानगीशिवाय पैसे काढल्यास बँक जबाबदार राहील, असं मत हायकोर्टानं व्यक्त केलं. ग्राहकांच्या हिताच्या रक्षणासाठी सावधानता बाळगणे हे बँकेचे कर्तव्य आहे. ग्राहकाच्या खात्यातून विनापरवानगी पैसे काढण्यापासून रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची जबाबदारी बँकेची आहे, असंही कोर्टानं नमूद केलं. एखाद्यानं अवैधपणे खात्यातून पैसे काढल्यास ग्राहकाच्या झालेल्या नुकसानीला बँक जबाबदार आहे. कारण त्यांनी हा गुन्हा रोखण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा तयार केली नाही, असंही कोर्टानं सांगितलं.