नोटाबंदीनंतरच्या काळात बँकेच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडला होता. या काळात लांबच्या लांब रांगा लावलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम केलं. जुन्या नोटा बदलणं, रोखता राखणं, एटीएममध्ये शक्य तशा नोटा भरणं, सतत बदलत असलेल्या घटनांची ग्राहकांना माहिती देणं अशा प्रकारची जास्तीची काम कर्मचारी करत होते. नोटाबंदीनंतर कामाच्या वेळांव्यतिरिक्त केलेल्या या कामासाठी ओव्हरटाइम दिला जाईल असं व्यवस्थापनानं जाहीर केलं होतं. स्टेट बँकेच्या समूहातील तत्कालिक सगळ्या बँका, यामध्ये स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर यांचा समावेश असून या कर्मचाऱ्यांना कबूल केलेला ओव्हरटाइम दिला. मात्र, आता या स्टेट बँकेशी संलग्न असलेल्या अन्य बँकांच्या 70 हजार कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना त्यावेळी दिलेला ओव्हरटाइम परत करा असं सांगण्यात येत आहे. एप्रिल 2017 मध्ये या बँका मुख्य स्टेट बँकेमध्ये विलिन करण्यात आल्या.
इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार स्टेट बँकेनं सगळ्या विभागीय मुख्यालयांना पत्र पाठवलं असून फक्त मुख्य स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम देण्यात येईल आणि नोटाबंदीच्या काळात जास्तीचं काम केलेल्या परंतु स्टेट बँकेच्या तत्कालिन संलग्न बँकांच्या कर्मचाऱ्यांना असा ओव्हरटाइम देता येणार नाही. हा ओव्हरटाइम मुख्य स्टेट बँकेच्या शाखांमध्ये काम करणाऱ्यांसाठी फक्त होता आणि संलग्न बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी नव्हता असं नमूद करण्यात आलं आहे.
नोटाबंदीच्या त्या कालावधीत या बँका स्टेट बँकेत विलिन झालेल्या नव्हत्या. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनाओव्हरटाइम देण्याची जबाबदारी तत्कालिन बँकांची होती, स्टेट बँकेची नाही असा पवित्रा स्टेट बँकेच्या व्यवसथापनानं घेतला असल्याचे इंडिया टुडेनं म्हटलं आहे. त्या बँकांच्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम देऊ असं आम्ही काही म्हटलं नव्हतं असं या पत्रात वमूद करण्यात आलं आहे. या वर्षी सुरूवातीला ओव्हरटाइम देण्यासंदर्भात जे धोरण जाहीर करण्यात आलं ते केवळ मुख्य स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांना लागू होतं, संलग्न बँकांच्या कर्मचाऱ्यांना नाही असा खुलासाही करण्यात आला आहे.
या वर्षी मार्च ते मे दरम्यान कर्मचाऱ्यांना 17 हजार ते 30 हजार या दरम्यान ओव्हरटाइम देण्यात आला. परंतु आता मात्र, संलग्न बँकेच्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम देण्यास आपण बांदील नव्हतो असा पवित्रा घेत स्टेट बँकेने या कर्मचाऱ्यांनी घेतलेला ओवहरटाइम परत करावा असे सांगितले आहे. या मुद्यावरून कर्मचारी संघटनाही नाराज झाल्या आहेत.
नोटाबंदीच्या काळात स्टेट बँकेशी संलग्न असलेल्या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम देतानाच चूक झाली आहे कारण हे कर्मचारी स्टेट बँकेत 2017 मध्ये विलिन झाले असं मत एका अधिकाऱ्यानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. खरंतर ती स्टेट बँकेची जबाबदारी नव्हती, परंतु त्यांना ओव्हरटाइम देऊन झाला आहे आणि त्यामुळे ती चूक निस्तरण्यासाठी ओव्हरटाइम परत करण्याचा आदेश काढण्यात आल्याचे बँकेच्या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.