ATM मधील लाखो रुपयांच्या नोटा उंदराने कुरतडल्या

ATM मधील लाखो रुपयांच्या नोटा उंदराने कुरतडल्या

चोरांनी एटीएममधील पैशांवर दरोडा टाकल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल मात्र, आता असा एक प्रकार समोर आला आहे जो ऐकल्यावर तुम्हालाही धक्काच बसेल. कारण, उंदरांनी एका एटीएममधील तब्बल १२ लाख रुपयांच्या नोटा कुरतडल्याचं समोर आलं आहे. आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

एटीएममधील उंदरांनी ज्या नोटा कुरतडल्या आहेत त्यामध्ये ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी येताच बँक अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. आता एटीएमच्या आतमध्ये उंदीर पोहोचले कसे? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान, या घटनेचा फोटोही सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

२० मे रोजी एटीएम केलं होतं बंद 

इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार, तिनसुकिया जिल्ह्यातील लाईपुली परिसरात असलेल्या एसबीआयचं एक एटीएम तांत्रिक बिघाडामुळे २० मे पासून बंद आहे. ११ जून रोजी जेव्हा बँकेचे अधिकारी एटीएम दुरुस्त करण्यासाठी दाखल झाले त्यावेळी त्यांना आश्चर्याचा एकच धक्का बसला. एटीएम उघडताच बँकेच्या स्टाफला ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांचे लहान-लहान तुकडे झालेलं दिसलं.

१२.३८ लाखांची रोकड

एटीएम जवळपास २० दिवसांपासून बिघाड झालेला होता आणि त्याच दरम्यान उंदरांनी नोटा कुरतडल्या. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, एटीएममध्ये असलेल्या १२ लाख ३८ हजार रुपयांच्या नोटा उंदरांनी कुरतडल्या. एका बँक अधिकाऱ्याने सांगितलं की, जवळपास १७ लाख रुपयांची रोकड नुकसान होण्यापासून वाचवली आहे. गुवाहाटीमधील फायनान्शिअल कंपनी एफआयएस ग्लोबल बिझनेस सोल्युशनच्या देखरेखीत हे एटीएम चालत असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

कंपनीने एटीएममध्ये २९ लाख रुपयांची रोकड मशीनमध्ये १९ मे रोजी जमा केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच एटीएममध्ये बिघाड झाला. एटीएममध्ये उंदीर गेलेच कसे याचं उत्तर अद्याप कुणाकडेच नाहीये. दरम्यान, एसबीआयतर्फे तिनसुकिया पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *