वर्तकनगर पोलिस वसाहतीतील धोकादायक इमारतीत वास्तव्याला असलेल्या पोलिस कुटुंबांना भाईंदरपाडा येथील इमारतींमध्ये स्थलांतरित करण्याच्या सूचना पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्या होत्या. मात्र, तिथे स्थलांतर केल्यास दैनंदिन जीवन विस्कळीत होईल, असा दावा करत या रहिवाशांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली होती. शिंदे यांच्या शिष्टाईनंतर या कुटुंबांना वर्तकनगर येथील आकृती रेंटल हाऊसिंगमध्ये घरे देण्याचा निर्णय झाला आहे.
वर्तकनगरमधील या पोलिस वसाहतीतील इमारती गेल्या काही वर्षांपासून धोकादायक झाल्या असून येथे ३३० पोलिस कुटुंबे जीव मुठीत धरून राहातात. त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये, यासाठी महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी भाईंदरपाडा येथील लोढा वसाहतीच्या सदनिकांमध्ये त्यांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. परंतु, मुलांच्या शाळा वर्तकनगरमध्येच असल्यामुळे भाईंदरपाडा येथे जाण्यास या कुटुंबांची तयारी नव्हती. वर्तकनगर परिसरातच पर्यायी घर द्यावे अशी मागणी करत त्यांनी पालकमंत्र्यांकडे धाव घेतली होती. त्यानंतर शिंदे यांनी जयस्वाल आणि एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव व अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर नियमांचा बागुलबुवा उभा न करता मानवतेच्या दृष्टिकोनातून या कुटुंबियांचे स्थलांतर आकृती प्रकल्पाच्या सदनिकांमध्ये करण्याबाबतचा निर्णय झाला आहे. त्यामुळे या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.