उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर नवीन शैक्षणिक वर्षांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असून शासकीय परिपत्रकानुसार १५ जून रोजी जिल्ह्य़ातील सर्व शाळा सुरू होणे अपेक्षित आहे. असे असतांना शहर परिसरातील इंग्रजी तसेच काही मराठी माध्यमांच्या शाळांनी १५ जूनआधी तर काहींनी त्यानंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तारखेतील या घोळामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये शाळेचा पहिला दिवस नेमका कोणता, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. नियोजित तारखेआधी शाळा सुरू करणाऱ्या संस्थांवर शासकीय निर्णयाचा अवमान केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर जूनमध्ये सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षांची नवलाई अनुभवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये विशेषत: पूर्व प्राथमिक, प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. नवा वर्ग, नवे दप्तर, नव्या वह्य़ा-पुस्तके, नवे शैक्षणिक साहित्य यासह रेनकोट, छत्री सर्व नवे राहणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. साहित्य खरेदीची यादी बाल गोपालांकडून पालकांच्या हाती सुपूर्द होत असतांना शाळा कधी सुरू होणार, याविषयीच वेगवेगळ्या तारखा पुढे येत आहेत. प्राथमिक तसेच माध्यमिक विभागात निकाल पत्रासोबतच शाळा सुरू होण्याच्या तारखा या विद्यार्थी तसेच पालकांना कळविण्यात आल्या आहेत. पूर्व प्राथमिकसाठी शाळेमध्ये मुले रमण्यासाठी काही ठिकाणी नियमित शाळा सुरू होण्याआधीच त्यांचे वर्ग भरविण्यात येत आहेत.
वास्तविक पूर्व प्राथमिक शिक्षण विभागाच्या कक्षेत येत नसल्याने त्यांनी शाळा कधी सुरू कराव्यात, याविषयी कुठलेही बंधन त्यांच्यावर नाही. प्राथमिक तसेच माध्यमिकसाठी शिक्षण विभागाने १५ जून रोजी जिल्ह्य़ातील सर्व शाळा सुरू करण्यात याव्यात, असे परिपत्रक काढण्यात आले आहे.
दरम्यान, इंग्रजी तसेच मराठी माध्यमांच्या काही शाळा तीन, आठ आणि ११ जून अशा वेगवेगळ्या तारखांना सुरू होत आहेत. याबाबत पालकांना लघुसंदेश तसेच निकालपत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे, १६ जून रोजी ईद असल्याने उर्दू माध्यमाच्या शाळा १८ जूनपासून नियमित सुरू होणार आहेत. शासकीय परिपत्रकाची तारीख खरी की निकालपत्रावरील दिलेली तारीख योग्य, यामुळे शाळा नेमकी कधी सुरू होणार याविषयी पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत शाळांमध्ये पालकांनी विचारणा केली असता १५ जून रोजी शाळा सुरू करण्यासंदर्भात कुठलेही परिपत्रक प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात येत असल्याने या गोंधळात भर पडत आहे.
त्या शाळांवर गुन्हे दाखल करणार
शासकीय परिपत्रकानुसार नाशिक शहर परिसरातील प्राथमिक शाळा १५ जून रोजी सुरू होणे बंधनकारक आहे. या तारखेआधी किंवा नंतर जर काही शाळा सुरू होणार असतील तर शासन निर्णयाचा अवमान केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील.
– नितीन उपासनी, नाशिक महानगरपालिका प्रशासनाधिकारी
