डॉक्टरांकडून तपासणी करून परतणाऱ्या गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

डॉक्टरांकडून तपासणी करून परतत असलेल्या गर्भवती महिलेवर रिक्षा चालकासह त्याच्या सहकाऱ्यांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना गुरूग्राम येथे घडली. हा प्रकार २१ मे रोजी घडला होता. परंतु, भितीपोटी या महिलेने पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. घटनेच्या चार दिवसानंतर पीडित महिलेने पोलिसांत तक्रार केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात रिक्षा चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूग्राम मधील मानेसर परिसरात ही घटना घडली. पीडित महिलेने वर्णन केल्याप्रमाणे संशयिताचा शोध सुरू आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. तक्रारीनंतर महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलेचा गर्भ सुरक्षित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ही महिला सहा महिन्यांची गर्भवती असून नियमित तपासणीसाठी ती पतीबरोबर सायकलवर रूग्णालयात गेली होती. काही अंतर चालल्यानंतर तिच्या पोटात वेदना होऊ लागल्या. त्यामुळे तिच्या पतीने तिला रिक्षातून घरी जाण्यास सांगितले. त्यावेळी पीडित महिला जवळच असलेल्या शेअर रिक्षात बसून घराकडे निघाली. रिक्षात आधीपासूनच दोन युवक बसले होते. काही अंतर गेल्यानंतर रिक्षातील इतर प्रवाशांनी पीडित महिलेला पिण्यासाठी पाणी दिले. त्यामुळे ती बेशुद्ध पडली. त्यानंतर या तिघांनी तिच्यावर बलात्कार केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *