हौशी खगोलशास्त्रज्ञांकडून बाह्य़ग्रहाचा शोध

रशियातील कोरोवका ग्रहसंशोधन प्रकल्पातील हौशी खगोलशास्त्रज्ञांनी गुरूसारखा तप्त बाह्य़ग्रह शोधला असून त्याचा परिभ्रमण काळ हा ४० तासांचा आहे. मातृताऱ्याभोवती हा ग्रह ४० तासांत एक प्रदक्षिणा पूर्ण करतो.

कोरोवका ग्रह संशोधन प्रकल्पात हा बाह्य़ग्रह शोधण्यात आला असून त्याचे नामकरण केपीएस १ बी असे करण्यात आले आहे. त्याचे गुणधर्म हे गुरूसारखे आहेत. तो मातृताऱ्याच्या खूप जवळ आहे. त्यामुळे त्याचे तापमान हे गुरूपेक्षा जास्तच आहे. रशियाच्या उरल विद्यापीठातील वैज्ञानिकांनी बाह्य़ग्रहसदृश खगोलीय वस्तूंचे नमुने शोधण्यासाठी सॉफ्टवेअर विकसित केले आहे. असे नमुने निवडल्यानंतर  त्यांचे वेगवेगळ्या वेधशाळांकडून निरीक्षण केले जाते त्यात रशियन अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेसच्या स्पेशल अ‍ॅस्ट्रोफिजिकल ऑब्झर्वेटरीचा समावेश आहे. वर्णपंक्तींचा अभ्यास करून सदर बाह्य़ग्रहाचे वस्तुमान काढण्याचे प्रयोग फ्रान्समधील हॉट प्रॉव्हेन्स ऑब्झर्वेटरी येथे केले जातात.

संशोधकांच्या दृष्टिकोनातून विचार केला असता सध्याचा शोध हा हा महत्त्वाचा असून हौशी खगोलशास्त्रज्ञांनी जमवलेल्या माहितीच्या आधारे उपलब्ध उपकरणांच्या मदतीने ग्रहाचा शोध घेण्यात आला आहे. बेल्जियम, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, नेदरलँडस, तुर्की, पोर्तुगाल, लिथुआनिया, इटली व कॅनडा येथील वैज्ञानिकांचा यात सहभाग होता.

नवीन बाह्य़ग्रहाचा शोध हा आपली सौरमाला कशी अस्तित्वात आली व नंतर कशी उत्क्रांत होत गेली यावर प्रकाश टाकणार आहे. या ग्रहाच्या वातावरणाचे तपमान गुरूपेक्षा जास्त आहे कारण तो मातृताऱ्याच्या फारच निकट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *