पर्यटननगरी असणाऱ्या मालवणच्या पर्यटनात नवे व साहसी आकर्षण ठरणाऱ्या तसेच पर्यटकांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिलेल्या हेलिकॉप्टर राईडचा शुभारंभ शनिवारी सकाळी झाला. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री. पांढरपट्टे यांच्यासह पर्यटकांनी हेलिकॉप्टर मधून उड्डाण करत समुद्रात लाटा झेलत उभ्या असणाऱ्या किल्ले सिंधुदुर्गचे विहंगम व मनोहारी हवाईदर्शन घेतानाच मालवणचे निसर्गसौंदर्यही न्याहाळले. जिल्ह्याच्या पर्यटनातील हा एक वेगळा पलू असून पर्यटकांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे असे यावेळी जिल्हाधिकारी श्री. पांढरपट्टे यांनी सांगत या उपक्रमाचे कौतुक केले. तर हवाई दर्शन करणाऱ्या पर्यटकांनीही आपल्यासाठी हा दुर्मिळ अनुभव असल्याचे सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड किल्ल्यांचे विहंगम व विलोभनीय दृश्य अनुभवता यावे यासाठी पुण्यामधील सिंहगड येथे हेलिकॉप्टरद्वारे हवाई किल्लेदर्शनाचा उपक्रम यशस्वी केल्यानंतर समुद्रातील दुर्ग- किल्ल्यांचेही हवाई दर्शन घेण्याचा आनंद पर्यटकांना लुटता यावा यासाठी मालवण येथे हेलिकॉप्टर द्वारे सिंधुदुर्ग किल्ल्याचे हवाई दर्शन उपक्रम राबविण्यात येत आहे. कोकणात हवाई पर्यटनाचा हा असा पहिलाच उपक्रम असून पुण्याचे नगरसेवक तथा राष्ट्रशक्ती संस्थेचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली दारवटकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम मालवणात होत असून या उपक्रमाची पूर्ण जबाबदारी व नियोजन मालवणचे युवा पर्यटन व्यावसायिक व अन्वय वॉटर स्पोर्ट्सचे अन्वय प्रभू यांच्यासह रुपेश प्रभू व रश्मीन रोगे हे सांभाळत आहेत. या ऐतिहासिक उपक्रमाचा शुभारंभ शनिवारी सकाळी देऊळवाडा येथे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी निवासी जिल्हाधिकारी विजय जोशी, ज्ञानेश्वर दारवटकर, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तहसीलदार समीर घारे, नगरपरिषद मुख्याधिकारी सौ. रंजना गगे, पर्यटन व्यावसायिक अन्वय प्रभू, रुपेश प्रभू, रश्मीन रोगे, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत, पोलीस निरीक्षक अमोल साळुंखे, वायरी भूतनाथचे सरपंच घनश्याम ढोके, एरोलीप कंपनीचे पदाधिकारी आदी व इतर उपस्थित होते. यावेळी आयोजकांच्या वतीने ज्ञानेश्वर दारवटकर, अन्वय प्रभू, रुपेश प्रभू यांच्या हस्ते जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
यावेळी उद्घाटनानंतर जिल्हाधिकारी पांढरपट्टे यांच्यासह अन्य शासकीय अधिकारी व पर्यटक यांनी हेलिकॉप्टर राईडद्वारे किल्ले सिंधुदुर्गच्या हवाई दर्शनाचा आनंद लुटला. हेलिकॉप्टर द्वारे मालवणसह किल्ला न्याहाळण्याची दुर्मिळ संधी मिळाल्याने सहभागी पर्यटक व स्थानिक नागरिक यांच्यात मोठे उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. या उपक्रमासाठी एरोलीप कंपनीने हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले आहे. या राईडसाठी देऊळवाडा येथील मोकळ्या जागेत हेलिपॅड बनविण्यात आले असून सर्व शासकीय परवानग्या घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक, पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिका, अग्निशमन बंब व इतर सुविधा उपलब्ध कारण्यात आल्या आहेत.
पर्यटनातील वेगळा पलू – जिल्हाधिकारी
मालवण येथे सुरू करण्यात आलेला हेलिकॉप्टर राईडचा उपक्रम मालवणसह जिल्ह्याच्या पर्यटनातील वेगळा पलू आहे. आज सामान्य लोकांना विमानात बसणे शक्य झाले असले तरी हेलिकॉप्टर मध्ये बसणे दुर्मिळ गोष्ट आहे. मात्र आज मालवणात ही संधी पर्यटकांसह जिल्हा वासीयांना उपलब्ध झाली असून पर्यटन विकासात हा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे. हेलिकॉप्टर मधून मालवणचे हवाई दर्शन करताना स्वर्गाचे दर्शन केल्याची अनुभूती आपणास मिळाली. दुर्ग भ्रमंती करणारयांसाठी देखील ही एक मोठी संधी आहे असे यावेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी सांगत या उपक्रमाचे कौतुक केले.
