लाचखोर डॉक्टर निलंबित

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालय येथे कार्यरत वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन तुकाराम वाघमारे यांनी शरीरात अल्कोहोल नसल्याचा दाखला देण्यासाठी ४ हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांनी या डॉक्टरला तपासासाठी ताब्यातही घेतले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी घेतली आहे. डॉ. सचिन वाघमारे यांनी महानगरपालिकेची प्रतिमा मलीन केल्याने महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी डॉक्टरला निलंबित केले आहे.

महानगरपालिका प्रशासनामार्फत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही, असे नमूद करीत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी यापुढे देखील गैरप्रकार व कामात हलगर्जी करणाऱ्या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. पारदर्शी, लोकाभिमुख व गतिमान प्रशासन राबविण्यासाठी आपण कृतीशील असून यामध्ये नागरिकांनीदेखील महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *