‘घराला घरपण देणारी माणसे’ तुरुंगात अशी दिसतात!

‘घराला घरपण देणारी माणसे’ तुरुंगात अशी दिसतात!

डीएसके अर्थात डि. एस. कुलकर्णी यांचे आणि त्यांच्या पत्नीचे म्हणजेच हेमंती कुलकर्णी यांचे तुरुंगातले फोटो व्हायरल झाले आहेत. ‘घराला घरपण देणारी माणसे’ असे बिरुद मिरवणाऱ्या डीएसकेंची अवस्था पाहून मनात वाईट नक्कीच वाटते. डीएसकेंच्या हाती गुन्ह्याची पाटी, त्यावर लिहिलेली कलमे, दीपक सखाराम कुलकर्णी असे नाव. त्यांच्या पत्नीचाही फोटो असाच. पाटीवर हेमंती कुलकर्णी असे नाव, गुन्ह्याची पाटी आणि चेहऱ्यावर पार हरवलेले भाव! सोशल मीडियावर हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

ड्रीम सिटी हा डीएसकेंचा ड्रीम प्रोजेक्ट होता. ते स्वप्न अपूर्णच राहिले आणि डीएसकेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. डीएसके आर्थिक अडचणीत सापडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही त्यांची बाजू घेत त्यांना पाठिंबा दर्शवला होता. मराठी व्यावसायिकांना संपवण्यासाठी लॉबी कार्यरत आहे असाही आरोप राज ठाकरे यांनी केला होता.

मात्र डीएसकेंना आणि त्यांच्या पत्नीला अटक झाली. फेब्रुवारी महिन्यात त्यांना आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली त्यानंतर त्यांची रवानगी पुण्यातील येरवडा तुरुंगात करण्यात आली. बांधकाम उद्योगाला मंदी आल्याने गुंतवणूकदार अडचणीत सापडले. मध्यमवर्गीयांना घरे मिळवून देणारे बांधकाम व्यावसायिक म्हणून डीएसकेंची ओळख होती. मात्र ड्रीम सिटी प्रोजेक्टनंतर त्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या.

सुखसोयींनी संपन्न असलेल्या ड्रीम सिटी प्रकल्पात वन बीएचके फ्लॅटची किंमत ७० लाखांपेक्षा जास्त हती. या प्रोजेक्टसाठी पुणे सोलापूर रस्त्यावरची ३०० एकर जागा डीएसकेंनी निवडली होती. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डीएसकेंनी आपली सगळी आर्थिक ताकद पणाला लावली होती. मात्र आर्थिक अडचणीत सापडलेले डीएसके आणखी अडचणीत सापडतच गेले. अखेर त्यांना आणि त्यांच्या पत्नीला फसवणुकीप्रकरणी अटक करण्यात आली. आता या डीएसके आणि त्यांच्या पत्नीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोतली या दोघांचीही अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचे दिसून येते आहे. डी एस कुलकर्णी यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर साम्राज्य उभे केले. मात्र आर्थिक अडचणीत सापडल्याने आणि ग्राहकांचे पैसे वेळेत परत न केल्याने त्यांना तुरुंगात जावे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *