१३ राज्यांना तुफान पाऊस आणि वादळाचा धोका, हरियाणामधील शाळांनी सुट्टी

देशभरातील १३ राज्यांना सोमवारी खराब हवामानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सोमवारी वादळासहित जोरदार पाऊस आणि गारा पडण्याची शक्यता वर्तवली आहे. गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात काही ठिकाणांवर वादळासहित गारांचा पाऊस होण्याची शक्यता आहे, तर उत्तराखंड आणि पंजाबमधील काही ठिकाणी जोरदार वारे वाहत पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात पाच राज्यांमध्ये वाळूच्या वादळाने थैमान घातलं होतं. यासोबतच पडलेल्या तुफान पावसामुळे जवळपास १२९ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले.

गृहमंत्रालय आणि हवामान खात्याने जारी केलेल्या अलर्टनंतर हरियाणाचे शिक्षणमंत्री राम बिलास शर्मा यांनी राज्यातील सर्व शाळा सोमवारी आणि मंगळवारी बंद राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. अनेक ठिकाणी लोकांचा झालेले मृत्यू आणि संपत्तीचं नुकसान पाहता पंचकुला प्रशासनाने लोकांना वादळ आणि पावसापासून आपली सुरक्षा करण्यासाठी योग्य ती पाऊलं उचलण्याचं आवाहन केलं आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या सुरक्षेसाठी योग्य ती उपाययोजना करण्यास सांगण्यात आलं आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये ५० किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून यावेळी विजांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाब आणि हरियाणातही याच वेगाने वारे वाहणार असून, तिथे वादळाची दाट शक्यता आहे.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या पश्चिम भागात वाळूचं मोठं वादळ येण्याची शक्यता असून, पाऊसही कोसळेल. दिल्ली-एनसीआरमध्ये वारे जोरात वाहतील, मात्र पाऊस हलका असेल. हवामान खात्यानुसार, येणारं वादळ किती भयानक असेल याचा अंदाज बांधणं थोडं कठीण आहे, मात्र ४ मे रोजी उत्तर प्रदेश आणि राजस्थानात १०० जणांचा जीव घेणाऱ्या वादळाइतकं भयानक नसावं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *