अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नग्न पुतळ्याचा १८ लाखात लिलाव

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सतत कोणत्या कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता चर्चा होते आहे ती त्यांच्या नग्न पुतळ्याला मिळालेल्या किंमतीची. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नग्न पुतळ्याचा लिलाव करण्यात आला. या लिलावात या पुतळ्याला २८ हजार डॉलर म्हणजेच सुमारे १८ लाख ६६ हजार रुपयांना विकण्यात आला.

२०१६ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या वेळी एका कलाकाराने डोनाल्ड ट्रम्प यांचे काही नग्न पुतळे तयार केले होते. हे नग्न पुतळे लॉस एंजलिस, सॅन फ्रॅन्सिस्को, न्यूयॉर्क, सिएटल आणि क्वीवलँड या ठिकाणी लावण्यात आले होते. या ठिकाणी लावण्यात आलेले हे पुतळे हटवून नष्ट करण्यात आले. मात्र त्यापैकी एक अखेरचा पुतळा नष्ट करण्यात आला नव्हता. या नग्न पुतळ्याचा लिलाव करण्यात आला. त्यावेळी लिलावात या पुतळ्याला २८ हजार डॉलर अर्थात भारतीय रुपयांप्रमाणे १८ लाख ६६ हजार रुपये इतकी किंमत मिळाली.

डोनाल्ड ट्रम्प यांचा हा नग्न पुतळा लॉस एंजलिस येथील ४६०० ब्लॉक या ठिकाणी असलेल्या हॉलिवूड बुलेवार्ड या ठिकाणी कडेकोट सुरक्षेत ठेवण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या न्यूड पुतळ्यांच्या श्रृंखलेपैकी हा शेवटचा पुतळा आहे. जिंजर या कलाकाराने हा पुतळा तयार केला असून या पुतळ्यासाठी माती आणि सिलिकॉन वापरण्यात आले आहे. या पुतळ्याचे वजन ८० पाऊंड आहे अशीही माहिती समोर आली आहे.

लॉस एंजलिस या ठिकाणी या नग्न पुतळ्याचा लिलाव करण्यात आला. ज्युलियन ऑक्शन चे सीईओ डेरेन ज्युलियन यांनी सांगितले की ट्रम्प यांचा हा नग्न पुतळा खरेदी करण्यासाठी अनेकांनी तयारी दर्शवली होती. मात्र आम्ही या पुतळ्याची विक्री सार्वजनिक पद्धतीने करायचे ठरवले म्हणूनच या पुतळ्याचा लिलाव करण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाले तर या पुतळ्याला नक्कीच चांगली किंमत येईल हे आम्हाला ठाऊक होते. म्हणूनच आम्ही या पुतळ्याचा जाहीर लिलाव केला आणि आम्हाला अपेक्षेप्रमाणे चांगली किंमत मिळाली असेही जुलियन यांनी म्हटले आहे. जॅक बॅगन्स यांनी हा नग्न पुतळा खरेदी केल्याची माहिती जुलियन यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *