सोन्याच्या मागणीत १२ टक्क्यांची घट

चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च २०१८) देशातील सोन्याच्या मागणीत १२ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. या कालावधीत ११५.६ टन सोन्याच्या मागणी नोंदविण्यात आली. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात झालेली वाढ हे मागणी घटण्यामागील प्रमुख कारण ठरले आहे. ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या (डब्ल्यूजीसी) अहवालात हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’च्या अहवालानुसार जानेवारी ते मार्च २०१७ या कालावधीत देशातील सोन्याची मागणी १३१.२ टन होती. जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान सोन्याच्या आयातीतही ५० टक्क घट होऊन ती १५३ टनांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २६० टन सोन्याची आयात करण्यात आली होती.

व्यवहारांतही घट

‘डब्ल्यूजीसी’च्या ‘गोल्ड डिमांड ट्रेंड्स’या अहवालानुसार सोन्याच्या व्यवहारांतही ८ टक्के घट होऊन ते ३१ हजार ८०० कोटी रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत सोन्याचे व्यवहार ३४ हजार ४४० कोटी रुपयांवर पोहोचले होते. यंदा पहिल्या तिमाहीत सोन्याच्या पुनर्वापरातही (रिसायकल) तीन टक्के घट (१४.१ टन) नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १४.५ टन सोन्याचा पुनर्वापर करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *