शरीरसुखाची मागणी करणारा शिक्षक अटकेत

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका कॉलेजच्या प्राध्यापकाने परीक्षेमध्ये पास करण्यासाठी विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्राध्यापकाला अटक केली आहे.

संदीप कांबळे (रा. वडगाव, धायरी) असे अटक केलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. या प्रकरणी खडकवासला येथील २२ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी वडगाव येथील एका महाविद्यालयात कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. कांबळे हा त्यांचा वर्गशिक्षक आहे. मार्च महिन्यात परीक्षा झाल्यानंतर २९ मार्चला त्याने या तरुणीला फोन केला. ‘तुला परीक्षेत पास केले, तर तू मला काय देणार,’ असे विचारले. यामुळे तरुणीने घाबरून फोन बंद केला. त्यानंतर त्याने तीन एप्रिलला फोन करून, ‘तुला परीक्षेत पास व्हायच असेल, तर मला सर्व काही द्यावे लागेल, आपण कात्रज घाटातील लॉजवर जाऊ, कोणालाही काही कळणार नाही,’ असे तिला सांगितले. या तरुणीने प्राध्यापकास स्पष्ट नकार देत हे सर्व बोलणे मोबाइलमध्ये रेकॉर्ड करून ठेवले. यानंतरही चार-पाच दिवस फोन करून प्राध्यापक तिला त्रास देत होता. या सर्व प्रकारामुळे ही तरुणी प्रचंड दबाबवा खाली होती. त्यानंतर काही समाजिक कार्यकर्त्यांच्या कानावर हा प्रकार आला. त्यांनी कुटुंबीयांना आधार देऊन शिक्षकाच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली. हवेली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *