टॅक्सी चालवतानाच शुद्ध हरपल्यानं अपघात

टॅक्सीचालक टॅक्सी चालवत असतानाच बेशुद्ध पडल्याने टॅक्सीवरील ताबा सुटून झालेल्या विचित्र अपघातात चालकासह १० जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज रात्री पावणेआठच्या सुमारास भायखळा येथील जे. जे. सिग्नलजवळ घडला.

जे. जे. जंक्शन ते मक्का मदिना रेस्टॉरण्टपर्यंत या टॅक्सीने अनेक जणांना उडवले. या विचित्र अपघातात १० जण जखमी झाले असून सर्व जखमींना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅक्सीचालकाचे नाव रिझवान खान (२६) असे आहे. टॅक्सी चालवत असतानाच रिझवान अचानक बेशुद्ध पडला आणि हा विचित्र अपघात घडला. रिझवान याला किरकोळ दुखापत झाली असून डॉक्टरांनी त्याचा वैद्यकीय इतिहास तपासला असता याआधी तो कधीही अशाप्रकारे बेशुद्ध झाल्याचे आढळून आलेले नाही.

खालिद अहमद (३०), शकिल मस्तान (३८), मोहम्मद अरिफ (२२), पशुपती (४०), अब्दुल शेख (५२), अब्बास मर्चंट (७५), वासिम खान (४३), इम्रान बोट (२७) आणि शमिमबानो (६७) अशी जखमींची नावे असल्याची माहिती जे. जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी दिली. जखमींपैकी खालिद अहमद आणि शकिल मस्तान यांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *