भिवंडी येथील एका हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आलेल्या एका तरुणीने सेक्स पॉवरचं इंजेक्शन घेतल्यानं तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सेक्स पॉवरच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस झाल्यामुळेच तिचा मृत्यू झालाचं निष्पन्न झालं असून तिचा प्रियकर फरार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं.
ही २९ वर्षीय तरुणी मुंब्रा येथील अमृतनगरमधल्या रशीद कंपाऊंडमध्ये राहते. ८ एप्रिल रोजी ती कल्याणमध्ये राहणाऱ्या तिच्या प्रियकरासोबत भिवंडीच्या कल्याण नाक्यावरील अशोका हॉटेलमध्ये आली होती. यावेळी तिने सेक्स पॉवर वाढविण्याचं इंजेक्शन घेतलं होतं. त्यामुळे तिची प्रकृती बिघडली. हे पाहून तिच्या प्रियकराने हॉटेलमधून काढता पाय घेतला. काही वेळाने हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले तेव्हा ही तरुणी बेशुद्धावस्थेत आढळून आली.
त्यानंतर तिला आयजीएमच्या उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर ती शुद्धीत आली. मात्र नंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतर डॉ. सुमय्या शमीम अन्सारी यांनी शांतीनगर पोलिसांना त्याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास सुरू आहे.
