चीनची अंतराळ प्रयोगशाळा कोसळली!

चीननं सात वर्षांपूर्वी अंतराळात सोडलेली आणि नियंत्रणाबाहेर गेलेली तियांगोंग  ही प्रयोगशाळा अखेर पृथ्वीवर कोसळली. बसच्या आकाराएवढ्या असलेल्या या प्रयोगशाळेचे आकाशातच तुकडे झाले आणि ती रविवारी रात्री ८ वाजून १६ मिनिटांनी म्हणजेच भारतीय प्रमाणवेळेनुसार आज पहाटे पाच वाजून १६ मिनिटांनी दक्षिण पॅसिफिक महासागरात कोसळली, अशी माहिती अमेरिकी स्ट्रॅटेजिक कमांडच्या ‘जेएफएससीसी’नं दिली.

तियांगोंग ही प्रयोगशाळा ३४ फूट लांब आणि ११ फूट रुंद होती. तिचं वजन ९ टनांपेक्षा अधिक होतं. चीननं सप्टेंबर २०११मध्ये तिचं प्रक्षेपण केलं होतं आणि ती दोन वर्षांपर्यंत कार्यरत राहण्याचा अंदाज होता. त्या तुलनेमध्ये ही प्रयोगशाळा २०१६पर्यंत कार्यरत राहिली. या काळामध्ये अनेक अंतराळवीर या प्रयोगशाळेमध्ये राहून आलेले आहेत, तसेच या प्रयोगशाळेतून अंतराळवीरांनी देशभरातील विद्यार्थ्यांबरोबर साधलेला संवादही चर्चेचा ठरला होता. मार्च २०१६मध्ये या प्रयोगशाळेचे काम थांबविण्यात आले होते. ही प्रयोगशाळा नियंत्रणाबाहेर गेली होती. ती पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर नेमकी कोणत्या ठिकाणी कोसळणार हे निश्चित सांगता येत नव्हते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *