विनयभंग करणाऱ्यास रोखण्यासाठी मुलीची गच्चीवरून उडी

अनोळखी व्यक्तीने अपहरण करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याने एका अल्पवयीन मुलीने इमारतीवरून उडी मारली. यात ही मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

नालासोपारा पूर्वेच्या अलकापुरी येथे राहणारी (वय १२ वर्षे) मंगळवारी दुपारी आर. के. महाविद्यालयाजवळील एका इमारतीत साहित्य घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी एका व्यक्तीने तिला बळजबरीने इमारतीच्या गच्चीवर नेले. त्याने तिथे तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. तिने मदतीसाठी धावा केला आणि थेट गच्चीवरून उडी मारली. ती उडी मारत असताना खाली असलेल्या गॅरेज चालकांनी रिक्षाच्या रबरी छत (हुड) पसरून तिला झेलण्याचा प्रयत्न केला. मात्र तरी ती खाली पडली आणि गंभीर जखमी झाली. तिला उपचारांसाठी नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुळींज पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात अपहरण, पोक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. इमारतीवरून तिने उडी मारली तो परिसर निवासी इमारतीचा आहे.

पीडित मुलीने याबाबत तक्रार दिली आहे. आम्ही सीसीटीव्ही तपासत आहोत, असे तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी सांगितले. या अनोळखी व्यक्तीने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिला थांबवले आणि जबरदस्तीने गच्चीवर नेले, अशी फिर्याद मुलीने दिल्याचे ते म्हणाले. तिने उडी का मारली किंवा ती अनोळखी व्यक्ती कोण होती याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *