पाचशे रुपयांसाठी महिलेवर चाकूहल्ला

उधारीच्या पैशाच्या वादातून सुनीता संजय ढोले (३८, रा. नेहरूनगर) यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना म्हाळगीनगर बगिच्यात मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. सुनिता यांना वाचविण्यासाठी गेलेला एक तरुणही या घटनेत जखमी झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून हल्लेखोराला अटक केली आहे. बाळकृष्ण सरदार बोरकर (४७, रा. नेहरुनगर) असे अटकेतील हल्लेखोराचे नाव आहे. बाळकृष्ण हा बांधकाम कंत्राटदाराकडे पर्यवेक्षक आहे. सुनीता यांनी बाळकृष्ण याच्याकडून पैसे उधार घेतले होते. ५०० रुपये द्यायचे शिल्लक होते. मंगळवारी बाळकृष्ण याने सुनीता यांना बगिच्यात बोलाविले. पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला. बाळकृष्ण याने सुनिता यांच्या पाठीवर, पोटावर चाकूने सपासप वार केले. ‌सुनीता यांना वाचविण्यासाठी एक तरुण गेला. बाळकृष्णने त्याच्यावरही चाकूने वार केले. ही घटना पाहून नागरिक धावले. त्यामुळे बाळकृष्ण पसार झाला. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी सुनीता यांना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सत्यवान माने यांच्या मार्गदर्शनाखाली हुडकेश्वर पोलिसांनी बुधवारी बाळकृष्ण याला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *