विमान कंपनी स्पाइसजेटमधील केबिन क्रूमध्ये काम करत असलेल्या महिला कर्मचा-यांनी कामावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. अंतर्वस्त्र काढून तपासणी करण्यात आल्याने संतापलेल्या महिला कर्मचा-यांनी हा इशारा दिला आहे. कंपनीने हा उद्दामपणा थांबवावा अशी कर्मचा-यांची मागणी आहे. महिला कर्मचा-यांनी कामबंद केल्यास स्पाइसजेटच्या सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिला क्रू मेम्बर्सना तपासणीदरम्यान अंतर्वस्त्र काढायला लावण्यात आले होते. महिला कर्मचा-यांनी केलेल्या आरोपानुसार, ज्या ठिकाणी ही तपासणी करण्यात आली, त्या ठिकाणी काय सुरु आहे हे कोणीही पाहू शकत होतं, सुरक्षेची कोणतीही काळजी घेण्यात आली नव्हती.
स्पाइसजेटच्या एका एअर हॉस्टेसचा व्हिडीओ शनिवारी व्हायरल झाला होता. चेन्नई विमानतळावरील या व्हिडीओत एअर हॉस्टेस कंपनीवर आक्षेपार्ह पद्धतीने तपासणी केल्याबद्दल आरोप करताना दिसत होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं.
स्पाइसजेटने आपल्या सुरक्षा विभागाने २८ आणि २९ मार्चला महिला कर्मचा-यांची तपासणी केल्याची कबुली दिली असून, यावेळी कपडे उतरवण्यात आल्याचा आरोप मात्र फेटाळला आहे. एका रिपोर्टनुसार, एअर हॉस्टेसने आपल्या हॅण्डबॅगमध्ये असलेलं सॅनिटरी नॅपकिनही ठेवून जायला सांगितलं होतं असा आरोप केला आहे. तर दुस-या एअर हॉस्टेसने आपली मासिक पाळी सुरु असतानाही वापरत असलेलं सॅनिटरी नॅपकिन काढायला लावल्याचा आरोप केला आहे.
