पानीपतहून नवी दिल्लीसाठी निघालेली ट्रेन जेव्हा शेवटच्या स्थानकावर थांबली तेव्हा थोड्या वेळासाठी प्रवाशांना नेमकं काय झालंय हेच कळत नव्हतं. प्रवाशांनी नवी दिल्लीला जाण्यासाठी प्रवास सुरु केला होता, मात्र ट्रेनने त्यांना जुन्या दिल्लीला पोहोचवलं. यानंतर रेल्वेने एका कर्मचा-याचं निलंबन केलं असून, सध्या घटनेची चौकशी सुरु आहे.
रेल्वेने घटनेसंबंधी माहिती देताना सांगितलं आहे की, पानीपतहून येणारी एक्स्प्रेस 64464 सकाळी ७.३० वाजता नवी दिल्ली स्थानकावर पोहोचणं अपेक्षित होतं. पण ट्रॅकमध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे ही ट्रेन सकाळी ७.५० ला जुन्या दिल्ली स्थानकावर पोहोचली.
आपली चूक लक्षात येताच ट्रेनला तात्काळ नवी दिल्ली स्थानकाकडे रवाना करण्यात आल्याचंही रेल्वेने सांगितलं आहे. दरम्यान प्रवाशांना विनाकारण झालेल्या त्रासामुळे रेल्वेने पॅनल संचालकाला निलंबित केलं असून, गैरजबाबदार वागणुकीसाठी जबाबदार कर्मचा-यांची माहिती घेतली जात आहे अशी माहिती देण्यात आली आहे.
