महिला सुरक्षेसाठी ‘रेल्वे वीरांगना’

महिला प्रवाशी सुरक्षा वर्षाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील आरपीएफने महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘रेल्वे वीरांगना’ नावाने एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला असून, यात आरपीएफ महिला अधिकारी- कर्मचारी, रेल्वे रनिंग स्टाफमधील कर्मचारी, तसेच रोज रेल्वेने ये-जा करणाऱ्या महिला प्रवाशांचा समावेश करण्यात आला आहे.

२०१८ हे वर्ष रेल्वे बोर्डाने महिला प्रवाशी सुरक्षा वर्ष म्हणून जाहीर केले आहे. यानिमित्त भारतीय रेल्वेतर्फे महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. नागपुरात अलीकडेच महिलादिनी अजनी स्थानक पूर्णत: महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुपुर्द करण्यात आले. संपूर्ण महिलांतर्फे संचालित होणारे हे मध्य भारतातील पहिलेच रेल्वेस्थानक आहे. आता आरपीएफचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतिजा यांच्या पुढाकाराने ‘रेल्वे वीरांगना’ नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे. रेल्वे गाडीत किंवा स्थानक परिसरात कुठे महिलांसबोत काही अनुचित प्रकार होत असेल तर लगेच त्याची माहिती ग्रुपवर टाकण्यात येईल व त्या माध्यमातून मदतीसाठी संवाद साधता येईल व संबंधित तक्रारीची तातडीने दखल घेतली जाईल. या ग्रुपमुळे महिला प्रवाशी आणि आरपीएफ यांच्यात थेट संवाद असणार आहे. या ग्रुपवर तक्रारी करता येतील त्याचप्रमाणे प्रवासाशी संबंधित काही सूचना असतील तर त्याही सुचविता येणार आहेत. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील विविध स्थानकांशी संबंधित जवळपास ८५ महिला प्रवाशांचा सध्या या ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *