उत्तर प्रदेशात आणखी एक कांड, दोन किशोरवयीन बहिणींना पेटवले

गोरखपूरमधील रुग्णालयात लहान मुलांचा करूण अंत झाल्याची घटना ताजी असतानाच बरेली जिल्ह्यातही एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घरात पलंगावर दोन किशोरवयीन बहिणी झोपलेल्या असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या पलंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यामध्ये या मुली गंभीररित्या भाजल्या असून एकीची प्रकृती नाजूक आहे. शुक्रवारी मध्यरात्री बरेली जिल्ह्यातील नवाबगंज भागात ही घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेत १८ वर्षीय गुलशन या मुलीची प्रकृती गंभीर आहे. तर तिची १७ वर्षीय बहिण फिजा ही ४० टक्के भाजली असून ती देखील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. आरोपी शुक्रवारी मध्यरात्री या मुलींच्या घरात शिरले त्यानंतर या मुली झोपलेल्या पलंगावर त्यांनी पेट्रोल टाकले आणि पलंग पेटवून दिला. आग लागल्याचा प्रकार घरातल्या मंडळींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या दोन्ही बहिणींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.

“काही लोकांनी शुक्रवारच्या रात्री २ वाजता आमच्या घरात शिरुन मी आणि माझी बहिण झोपलेल्या पलंगावर पेट्रोल टाकले आणि पंलंग पेटवून दिला. मात्र, हे लोक कोण होते ते आम्हाला ठाऊक नाही. जेव्हा आम्हाला जाग आली तेव्हा ते पळून गेले होते. आम्ही त्यांचे चेहरे पाहू शकलो नाही” असे फिजा या पीडित मुलीने पोलिसांच्या जबाबात सांगितले.

“हे कृत्य करणारे लोक कोण होते, हे आम्हाला कळू शकलेले नाही. आमचे कुणाहीशी वैर नव्हते” असे पीडित मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी खास पथक तयार केले आहे. गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *