गर्भपातासाठी १२ वर्षांच्या मुलीची सर्वोच्च न्यायालयात धाव

अज्ञात आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबईतील चारकोप परिसरात राहाणाऱ्या १२ वर्षांची मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी चारकोप पोलिसांनी आईच्या तक्रारीवरून अनोळखी आरोपीविरोधात बलात्कार, बाललैंगिक अत्याचारविरोधी प्रतिबंध कायद्यान्वये (पॉक्सो) गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. दरम्यान, तिच्या पालकांनी गर्भपातासाठी परवानगी द्यावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

भारतात २० आठवडय़ांपर्यंत गर्भपात करण्याची परवानगी असल्याने आतापर्यंत मुंबईतील ९ गर्भवतीनीं सर्वोच्च न्यायालयात गर्भपाताच्या परवानगीसाठी धाव घेतली आहे. यापैकी सात महिलांनाच गर्भपाताची परवानगी देण्यात आली असून इतर दोन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातास नकार दिला होता. त्यानंतर बुधवारी चारकोप परिसरातील एका १२ वर्षांची अल्पवयीन मुलगी रुग्णालयात तपासणीसाठी गेली असता ती २७ आठवडय़ांची गर्भवती असल्याची बाब उघड झाली. या घटनेमुळे तिच्या पालकांना मोठा धक्का बसला असून बुधवारी त्यांनी बाललैंगिक अत्याचारविरोधी प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

अनेकदा गर्भातील व्यंग २० आठवडे उलटून गेल्यानंतर लक्षात येतो. त्यामुळे २० आठवडय़ांनंतरही गर्भपाताची परवानगी देण्याची आवश्यकता आहे, असे मालाडचे क्लाऊडनाईन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल दातार यांनी सांगितले. चारकोपच्या प्रकरणात १२ वर्षांची अल्पवयीन मुलगी २७ आठवडय़ांची गर्भवती आहे. तिचा तातडीने गर्भपात करणे गरजेचे आहे. सर्वोच्च न्यायालयात याचिका करणे, राज्य सरकारच्या समितीकडून त्या मुलीची वैद्यकीय तपासणी व तिचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करणे या प्रक्रियेत बराच वेळ वाया जातो आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्यासाठी सर्वच कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते, असेही डॉ. दातार यांनी सांगितले. अल्पवयीन मुलीची प्रसुती करणे धोक्याचे असते. त्यामुळे मुलीच्या भविष्याचा विचार करता गर्भपात हाच पर्याय आहे, असे स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. अश्विनी भालेराव गांधी यांनी सांगितले. दरम्यान चारकोप पोलिसांनी मुलीच्या आईचा जबाब नोंदवून त्याआधारे बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अनोळखी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *