इंदौरमधल्या सातवीत शिकणाऱ्या मुलानं ब्लू व्हेल खेळातील शेवटच्या टप्प्याचं आव्हान स्वीकारत शाळेच्या इमारातीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवानं वेळीच त्याच्या वर्गमित्रांच्या ही बाब लक्षात आली आणि त्यानं या मुलाला आत्महत्या करण्यापासून रोखलं.
राजेंद्र नगर पोलिसांनी ‘हिंदुस्थान टाइम्स’ ला दिलेल्या माहितीनुसार, या शहरातील चमेली देवी पब्लिक स्कूलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे. गेल्या पन्नास दिवसांपासून हा विद्यार्थी आपल्या वडिलांच्या मोबाईलमध्ये ब्लू व्हेल गेम खेळत होता. या खेळाचं सगळे टप्पे त्यानं पार केले होते शेवटच्या टप्प्यात त्याला आत्महत्या करण्याचं आव्हान होतं आणि त्यानं तसं करण्याचा प्रयत्न केला. हा विद्यार्थी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याच्या तयारीत होता. पण इतर विद्यार्थ्यांच्या ही बाब वेळीच लक्षात आली आणि त्यानं या विद्यार्थ्याला वाचवलं. या संपूर्ण प्रकरणानंतर शाळेच्या मुख्यध्यापकांनी पोलिसांना आणि त्याच्या कुटुंबियांना याची माहिती दिली.
ब्लू व्हेल गेमसंदर्भातील ही देशातली तिसरी घटना आहे. सोलापूरच्या एका चौदा वर्षीय मुलानं ब्लू व्हेल खेळाचं आव्हान स्वीकारून घर सोडलं. या गेममधील एका आव्हानामुळे हा शाळकरी मुलगा बुधवारी सकाळी घरातून बाहेर पडला आणि सोलापूर बसस्थानक भागातून तो बसमधून पुण्याकडे निघाला. पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचल्याने पोलिसांकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर या मुलाला गुरूवारी भिगवण बसस्थानकातून पोलिसांनी ताब्यात घेतलं. गेल्याच आठवड्यात अंधेरी पूर्वेकडील ‘शेर ए पंजाब’ वसाहतीत राहणाऱ्या मनप्रीत सिंग या चौदा वर्षांच्या विद्यार्थ्यांने गच्चीच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. त्यालाही ब्लू व्हेल खेळाचं व्यसन लागलं होतं तेव्हा ब्लू व्हेल खेळामुळेच त्यानं आत्महत्या केली असा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता.
रशियातून या खेळाचं लोण हळूहळू भारतात पसरलं. रशियामध्ये या खेळानं चांगलीच दहशत पसरवली. या खेळामुळे आतापर्यंत तिथे शंभरहून अधिक मुलांनी आत्महत्या केली.
