काहींच्या डोक्यात थरार अनुभवण्याची झिंग एवढी चढलेली असते की त्यासाठी ते काहीही करायला तयार होतात. अगदी यात आपला प्राण गेला तरी बेहत्तर पण आपण किती ‘डेअरडेव्हिल’ आहोत हे जगाला दाखवून द्यायचं एवढंच त्यांना ठावूक असतं. या नादात आतापर्यंत कित्येकांनी आपला जीव गमवला असेल, त्यांना आलेलं मरण शत्रूच्याही वाट्याला येऊ नये असंच असतं. इतकी उदाहरणं डोळ्यासमोर असूनही ते आपला जीव धोक्यात घालतात. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात चार तरुण चीनमधल्या सर्वात उंच इमारतीच्या अँटिनावर चढून सेल्फी घेत होते.
त्यांच्याजवळ सुरक्षेचे कोणतही उपकरणं नव्हते, ना डोक्यावर हेल्मेट होतं. तरीही हे चारजण ८९ मजल्यांच्या इमारतीवर चढले. ही जगातली चौदाव्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत आहे. या इमारतीच्या छतावर दीड हजार फूट उंच अँटीना आहे. हे चौघंहीजण या अँटीनावर चढले. अँटीनाचं टोक गाठत या सर्वांनी तिथून सेल्फी काढले. आपल्याला असं करताना अपघात होऊ शकतो किंवा आपला जीव जाऊ शकतो याची कोणतीही भीती या दोघांच्याही चेहऱ्यावर नव्हती. अगदी आरामात हे चौघंही आपापले सेल्फी काढण्यात मग्न होते. चीनच्या सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झाले. चार्ली नावाच्या अकाऊंटवरून हे फोटो अपलोड करण्यात आलेत.
काही पत्रकारांनी चार्लीला जीव धोक्यात घालण्याचं कारण विचारलं. तेव्हा आम्ही काही मुलांना दाखवून देण्यासाठी हा स्टंट केला असंही ते म्हणाले. दोन वर्षांपूर्वी परदेशातले काही अल्पवयीन मुलं या अँटीनावर चढले होते. जर ते करू शकतात तर आम्ही का नाही? आम्हाला त्यांना आव्हान द्यायचं होतं म्हणून आम्ही जीव धोक्यात घालून स्टंट केला अशी कबुली त्यांनी दिली.

