नवाजुद्दीनच्या सिनेमाला अमृता फडणवीसांचं पार्श्वगायन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा पार्श्वगायिकेच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आगामी ‘अ ब क’ या सिनेमासाठी त्या पार्श्वगायन करणार आहेत. विशेष म्हणजे या मराठी सिनेमात बॉलिवूड स्टार नवाजुद्दिन सिद्दीकी आणि तमन्ना भाटिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अमृता जे गाणं गाणार आहेत त्यातून ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ असा संदेश देण्यात येणार आहे. नुकतेच या गाण्याचे रेकॉर्डिंग मुंबईत पार पडले असून राहुल रानडे याने या सिनेमाच्या गाण्यांना संगीत दिले आहे.

हा जरी मराठी सिनेमा असला तरी यात हिंदी कलाकारांची पूर्ण फौज पाहता येणार आहे. या सिनेमात ‘लायन’ सिनेमा फेम सनी पवारसह नवाजुद्दीन सिद्दकी, तमन्ना भाटिया, सुनील शेट्टी, तन्वी सिन्हा आदी दिग्गज कलावंत काम करणार आहेत. या सिनेमाचे वैशिष्टय असे की हा सिनेमा एकाच वेळी मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू अशा पाच भाषेत निर्माण होणार आहे. या  सिनेमाचे चित्रीकरण १५ ऑगस्टपासून सुरु होणार आहे.

यापूर्वी अमृता फडणवीसांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्यावर आधारित ‘संघर्षयात्रा’ या सिनेमात पार्श्वगायन केलं होतं. त्याचप्रमाणे प्रकाश झा यांच्या ‘जय गंगाजल’ या सिनेमातही त्यांचा सुमधूर आवाज प्रेक्षकांना ऐकायला मिळाला होता. काही दिवसांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांनी एक अल्बमदेखील केला होता. याशिवाय ‘विश्वविधात श्रीपाद श्रीवल्लभ’ या सिनेमात त्यांच्या आवाजातील गाणं ऐकायला मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *