शिमलामधील रामपूरजवळ एका खासगी बसला भीषण अपघात झाला. रामपूरमधील खनेरीजवळ खासगी बस अंदाजे २०० मीटर खोल दरीत कोसळली. या अपघातात २० प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं कळतं. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिकांच्या मदतीनं प्रशासनानं बचाव आणि मदतकार्य हाती घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास झाला. खासगी बसमध्ये ४० प्रवासी असल्याची माहिती मिळते. शिमलापासून १२० किलोमीटरवरील रामपूर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचवर ही दुर्घटना घडली. या अपघातात २० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर इतर जण जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी बचाव आणि मदतकार्य हाती घेतलं आहे. आतापर्यंत चौघांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
