24 तासांत मुंबई, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई शहर व उपनगरात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पूर्व व पश्चिम उपनगरांत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. वरळी, विले पार्ले, अंधेरी, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात जोरदार पावसाच्या सरी आहेत. दरम्यान, 24 तासांत मुंबई व कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला आहे. आतापर्यंत रस्ते व रेल्वे वाहतूक सेवा सुरुळीत सुरू आहेत, वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
तर गुरुवार (13 जुलै), शुक्रवार (14 जुलै) आणि शनिवार (15 जुलै) असे तब्बल तीन दिवस मनमुराद बरसलेल्या मान्सूनने, रविवारी (16 जुलै ) मात्र विश्रांती घेतली. किंचित कुठे तरी बरसलेल्या पावसाच्या एक-दोन सरी वगळता, रविवारी दिवसभर मान्सूनचा शुकशुकाट होता. दरम्यान, पावसाने विश्रांती घेतली असली, तरी पडझडीच्या घटना घडल्या असून, सुदैवाने यात हानी झालेली नाही.
मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारच्या सकाळी 8.30 वाजण्याच्या नोंदीनुसार, शहरात २४.३५, पूर्व उपनगरात ६९.२१ आणि पश्चिम उपनगरात ४७.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरात एक, पूर्व उपनगरात दोन आणि पश्चिम उपनगरात एक अशा एकूण तीन ठिकाणी बांधकामांचा भाग पडला. शहरात सहा, पश्चिम उपनगरात एक अशा एकूण सात ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात १६, पूर्व उपनगरात १८ आणि पश्चिम उपनगरात २४ अशा एकूण ५८ ठिकाणी झाडे पडली. सुदैवाने या दुर्घटनांत जीवितहानी झाली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *