पाच दुचाकी, एक रिक्षा जाळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
ठाणे शहरात काही महिन्यांपासून वाहन जळीतकांड सुरू असून रविवारी सकाळी पाचपाखाडी परिसरातील सहा वाहने अज्ञात इसमांनी जाळल्याची घटना घडली.
सिद्धेश्वर तलावाजवळ उभ्या करण्यात आलेल्या पाच दुचाकी आणि एक रिक्षा जाळल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या घटनेत महिला रिक्षाचालकाची अबोली रिक्षाही जाळण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाहन जाळण्याचे प्रकार ठाणे शहरात सातत्याने घडत असल्याने वाहनमालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वाहन जाळण्याचे प्रकार ठाणे शहरात काही महिन्यांपासून सुरू आहेत. मे महिन्यात लोकमान्य परिसरातही अशाच प्रकारे सहा वाहने जाळण्याची घटना घडली होती. या वाहनांमध्येही पाच दुचाकी आणि एक रिक्षा जाळण्यात आल्या होत्या. या सारखाच प्रकार रविवारी पहाटे पाचपाखाडी परिसरात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यात तपास सुरूआहे.
गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरात वाहन जाळण्याचे प्रकार सातत्याने सुरूअसून पाचपाखाडी परिसरातील सिद्धेश्वर तलाव येथे उभ्या करण्यात आलेल्या पाच दुचाकी आणि एक रिक्षा रविवारी पहाटे पाचच्या सुमारास अज्ञात इसमांनी जाळली. यामध्ये होंडा, टीव्हीएस अशा काही कंपन्यांच्या दुचाकी तसेच सुनीता आंग्रे या महिला रिक्षाचालकाची अबोली रिक्षा जाळण्यात आली आहे. या प्रकरणी सुनीता आंग्रे यांनी अज्ञात इसमाविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.