पुण्यात बीबीएच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने काल (शुक्रवारी) रात्री आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज विमानतळ पोलिसांनी व्यक्त केला आहे. हा विद्यार्थी सिम्बॉयसिस महाविद्यालयात शिक्षण घेत होता.
राहुल अनिल अग्रवाल या विद्यार्थ्याने काल रात्री आत्महत्या केली. राहुल अग्रवाल मूळचा नेपाळचा रहिवासी होता. राहुल बीबीएच्या पहिल्या वर्षात शिकत होता. तो पुण्यात ३ मित्रांसोबत विमाननगर येथील फ्लॅटमध्ये राहत होता. राहुल काल कॉलेजमधून लवकर घरी गेला होता. तेव्हा त्याचे मित्र रूमवर नव्हते. त्याचे मित्र रात्री १० वाजता घरी आले. त्यावेळी आतून दरवाजा बंद होता. खूप वेळ बेल वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने राहुलच्या मित्रांनी पोलिसांना बोलावले. तेव्हा आतमध्ये त्यांना राहुल मृतावस्थेत आढळून आला. मात्र राहुलच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नसून नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.