आयकर अधिकाऱ्याच्याच घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

करबुडव्यांच्या घरांवर छापे टाकून त्यांना गजाआड करणाऱ्या एका आयकर अधिकाऱ्याच घरी मोठं घबाड सापडलं आहे. सीबीआयनं बुधवारी झारखंडचे आयकर विभागाचे प्रधान आयुक्त तपस कुमार दत्ता यांच्या कोलकाता येथील घरी छापा टाकला. त्यात तब्बल ३.५ कोटींची रोकड आणि ५ किलो सोनं हाती लागलं आहे. सीबीआयनं कोलकाता आणि रांचीमध्ये एकूण २३ ठिकाणांवर छापे टाकले. त्यात दत्ता यांच्या घरी टाकलेल्या छाप्यात हे घबाड हाती लागलं आहे.

आयकर विभागाचे प्रधान आयुक्त तपस कुमार दत्ता आणि इतर अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली गुन्हे दाखल झाल्यानंतर सीबीआयनं कोलकातामध्ये १८ ठिकाणी आणि रांची येथे पाच ठिकाणी छापेमारी केली. छापेमारीत दत्ता यांच्या घरातून साडेतीन कोटींची रोकड आणि ५ किलो सोनं जप्त करण्यात आलं. या ५ किलो सोन्याची किंमत बाजारभावानुसार अंदाजे दीड कोटींच्या आसपास आहे. तसंच अनेक महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.

२०१६-१७ मध्ये आयकर विभागाचे तीन अधिकारी आणि कोलकाता येथील उद्योजकांशी संगनमत करून गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप दत्ता यांच्यावर आहे. दत्ता यांनी उद्योजकाकडून एका सीएमार्फत मोठी रक्कम लाच स्वरुपात घेतली. अनेक व्यक्तींच्या आयकरासंबंधी फायली कोलकाताहून रांचीच्या हजारीबागला हस्तांतरित करण्यासाठी ही लाच घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर सीबीआयनं त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले. कोट्यवधींच्या रकमेसह पाच किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. तसंच अनेक महत्त्वाची कागदपत्रेही हाती लागली आहेत. त्यावरून आणखी काही अधिकारी जाळ्यात सापडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *